जैवविविधतेने नटलेल्या पश्चिम घाटातील आंबोलीत आजवर अनेक प्राणी व पक्ष्यांच्या दुर्मीळ प्रजाती आढळून आल्या आहेत. त्यामुळे वन्यप्राणी अभ्यासकांसाठी आंबोली हे अभ्यास केंद्र ठरू लागले आहे. पश्चिम घाट हा जैविक संपत्तीचा मोठा साठा आहे. खरोखर त्याच्या अंतरंगात अगणितता आहे. त्याची निर्मितीच मुळी ज्वालामुखीतून प्राचीन काळी झालेली होती. याचे अनेक पुरावे दृष्टोत्पत्तीस येतात.
औषधी गुण असलेल्या अनेकविध वनस्पती पश्चिम घाटात आहेत. आंबोलीच्या नितांत रमणीय प्रदेशातील राखीव जंगल हे देशी-परदेशी विद्यार्थ्यांचे संशोधनाचे स्थळ आहे. या जंगलात सरडा, कोळी, बेडूक यांच्या विविध प्रकारच्या दुर्मीळ प्रजाती आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात २२० ते २२५ प्रजातीची फुलपाखरू आहेत. आंबोली आणि पारपोली भागात २१८ प्रजातीची फुलपाखरू आढळतात काही दिवसांपूर्वी अशाच अभ्यास दौ-यावर आलेल्या गिरीश पंजारी यांना या भागात दुर्मीळ ‘ब्राऊन पाम सिव्हेट’ हा रानमांजर प्रजातीतील प्राणी आढळून आला. केरळ-कर्नाटक येथील जंगलात दिसणारा हा प्राणी आंबोलीत आढळल्याने प्राणीप्रेमींमध्ये कुतूहल निर्माण झाले होते. या प्राण्याचा अधिक शोध घेताना त्याचे अनेक साथीदार गेल्या कित्येक वर्षापासून राहत असल्याचे लक्षात आले. यापूर्वीही आंबोलीतील जंगलात ‘कॅस्टोज कोरल स्नेक’ ही दुर्मीळ सापाची प्रजाती आढळली होती. ‘उडता सोनसर्प’ आणि ‘ब्लू नवाब’ हे फुलपाखरू याच भूमीत आढळते. ब्राऊन पाम सिव्हेट हा उदीर-मांजरांसारखा प्राणी महाराष्ट्रात प्रथमच आढळून आला आहे. वडासारख्या वृक्षांवर फळे खाणारा हा प्राणी रानमांजरसदृश आहे.